पुतळे

पुतळेच चालवतात हा देश.
पुतळेच थांबवतात हा देश..

पुतळे आजहि बोलतात..
कुणाच्या तरी विरूध्द विष पेरायला...

पुतळे उंच उंच पोहचतात..
कुणाची तरी उंची कमी दाखवायला..

पुतळे सारेच असतात आत्ममग्न,
देश होत असतो हळुहळु तेव्हा भग्न...

पुतळे लढवतात निवडणुका..
पण होतो त्यांच्या विचारांचा दणक्यात पराभव...

पुतळे घर होतात कबुतर कावळ्यांची..
जातींची कबुतर अन कावळे धर्मांची...

उंच पुतळे पहायला खुज्या विचारांची लोक जातात..
विचार समजवुन सांगायला महापुरुषांचे पुतळे व्हावे लागतात..

रोजगारनिर्मितीसाठि आता पुतळे बांधावे लागतात..
नोकऱ्या म्हणुन गावातल्या पोरांना आता काकड्या बोर विकावी लागतात..
कारण ते म्हणतात कोणतीहि कामं छोटि नसतात..

अखेर शेवटि काहिच झाल नाहि तरी दंगली बनवता येतात पुतळ्यांभोवती..
जाती धर्मातल्या मतांची मग सहजच होते विभागणी...

आपले सर्वांचेच शेवटि पुतळे होतात शोभेची..
ढिम्म निपचित उभी वेगवेगळ्या धाटणीची..
मग बसतात कबुतर कावळे धर्मजातींची..
करत जातात घाण आपली माथी..

आपण तसेच असतो थिजलेल्या मुर्दाड अवस्थेत..
भगव्या हिरव्या निळ्यापिवळ्या साखरझोपेत..

काहि कारागीर असतात जिवंत आपल्याला पुतळे बनवायला..
देवादेवळाच्या पिढ्यानपिढ्या शिळ्या भाकरी चारायला...
पुतळे चक्क जिवंत होतील मग मंदिरं मस्जिदि बांधायला...
धर्मांधतेत मरतील मग माणुस म्हणुन पुन्हा पुतळे व्हायला...

पुन्हा त्यांचीच माती त्यांचेच पुतळे..
देवधर्मांच्या नादापायी सुजलाम् सुफलाम् देशाची लक्तरे..

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत