मनुस्मृती दहन : स्वातंत्र्याचा अविरत लढा | किरण
मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. ‘मनुस्मृती’ जाळण्याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३ फेब्रुवारी १९२८च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकातही दिलेले आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – “आम्ही जे ‘मनुस्मृती’चे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. १५८ : २) ‘र...