मनुस्मृती दहन : स्वातंत्र्याचा अविरत लढा | किरण

मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. ‘मनुस्मृती’ जाळण्याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३ फेब्रुवारी १९२८च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकातही दिलेले आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – “आम्ही जे ‘मनुस्मृती’चे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. १५८ : २) ‘रिडल्स इन हिंदुइझम’ (खंड ४) या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडलच ‘MANU’S MADNESS’ म्हणजे ‘मनूचा वेडेपणा’ या नावाने लिहिले आहे. इथेही त्यांनी ‘मनुस्मृती’ची चिकित्सा केलेली आहे. बाराव्या खंडातही (पृ. ७१९-७२४) डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ची समीक्षा केलेली आहे. काही लोकांचे असे म्हणणे असू शकते की, ‘मनुस्मृती’ ही गतकाळात होऊन गेली. आता हिंदूंच्या वर्तनाशी तिचा काहीही संबंध नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, असे समजणारांची ही मोठी गफलत आहे. त्यांनी लिहिले आहे – “Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a ‘living past’ and therefore as really present as any present can be.” (पृ. ७१९) या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार ‘मनुस्मृती’ हा वर्तमानकाळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. याचा अर्थ असा की, ‘मनुस्मृती’ची निर्मिती इ.स.च्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्परतुच्छता या गोष्टी केवळ आज कायम आहेत असे नाही, तर त्या आज अधिक कडवे रूप धारण करीत आहेत. ‘मनुस्मृती’ या नावाचे एक पुस्तक जाळणे, ‘मनुस्मृती’ या नावाची एक प्रत जाळणे, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश नाही. ‘मनुस्मृती’ जाळणे याचा अर्थ मनुस्मृतीने लोकांच्या मनात भरलेली विषमता जाळणे असा आहे. ‘मनुस्मृती’ने लोकांच्या मनावर उच्चनीचतेचे संस्कार केलेले आहेत आणि या संस्कारापासून ती लोकांना मुक्तच होऊ देत नाही. या देशातील लोकांची मने ‘मनुस्मृती’ने विषमतेशी पक्की बांधून ठेवली आहेत. त्यामुळे लोकांना समता ही गोष्ट अस्तित्वात असू शकते असे वाटतच नाही. म्हणूनच ‘मनुस्मृती’ जाळणे म्हणजे लोकांची ही समजूत जाळणे होय. याप्रकारे लोकांची मने बदलणे, लोकांचे मानसशास्त्र बदलणे अर्थात मनांतर करणे हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश आहे. समता जाळणारा हा ग्रंथ जाळणे, लोकांची माणुसकी जाळणारा हा ग्रंथ जाळणे, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश आहे. माणसांमध्ये उच्चनीचतेचे हलाहल पसरवणारा मनूचा कायदा आता चालू ठेवणे योग्य नाही. मानवी मूल्यांच्या दृष्टीने, मानवअधिकाराच्या प्रतिष्ठेसाठी हा जन्मजात विषमता सांगणारा, सनातन म्हणजे विश्वारंभापासूनचा आणि तो कधी बदलू नये या हेतूने सांगितलेला हा कायदा यापुढे चालणे योग्य नाही. समतेला, स्वातंत्र्याला, बंधुतेला आणि सामाजिक न्यायालाही जन्मालाच येऊ न देणारा हा कायदा जाळून टाकायलाच हवा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तीव्रपणे वाटले आणि त्यांनी मनूच्या विषमतेला आग लावली. पवित्र मानला गेलेला हा विषमतेचा कायदा जाळला जाऊ शकतो, हे लोकांच्या मनावर बिंबवावे आणि त्यांच्या मनात स्वतंत्र विचार करण्याची, समतेची प्रस्थापना करण्याची ताकद जागवावी, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टीका सर्वमान्य आहेत." या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनाने प्रकाशित केलेले आहेत. आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ.ह.साळुंखे व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. मनुस्मृती हा ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्याचे 2634 श्लोक आहेत. बापटशास्त्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.] ह्यातील बरेचसे श्लोक अतिशय किळसवाने, वाचायलाहि लाज वाटेल असे असल्या कारणाने इथे टाकत नाही. पन तुम्ही ते बापटशास्त्रीच्या ग्रंथात वाचू शकतात. मनुस्मृती 2.213 संस्कृत: स्त्रियो हि दुर्बलाः स्युः कामक्रोधवशानुगाः । अर्थ (मराठी): स्त्रिया स्वभावतः दुर्बल असून त्या काम आणि क्रोधाच्या अधीन असतात. मनुस्मृती 9.17 न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति । अर्थ: स्त्री स्वतंत्रतेस पात्र नाही. मनुस्मृती – अध्याय 9, श्लोक 14 स्वभावेण स्त्रियो लोके पुरुषान् व्यभिचारिणः । तस्मात् सावधयेत् स्त्रीः स्वेषु कार्येषु सर्वदा ॥ या जगात स्त्रियांचा स्वभाव असा आहे की त्या पुरुषांपासून विचलित (व्यभिचाराकडे झुकणाऱ्या) होतात, म्हणून पुरुषांनी आपल्या स्त्रियांवर नेहमी लक्ष ठेवावे / त्यांना नियंत्रणात ठेवावे. " ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [3/8] " जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ 3/11] " नवर्‍याने पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [4/43] " आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- "बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [5/47] " स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [5/48] " पिता, पती, पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [5/49] " पती जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [5/150] " लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152] " पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154] "पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [5/155] "स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये" [5/162] "स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [5/166] " पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [5/168] " पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [6/2] " विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ 6/3] " स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात." [9/18] " नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते." [9/46] मनुस्मृती 8.413 शूद्रो ब्राह्मणमासाद्य वाचं प्रहर्तुमर्हति जिह्वां तस्य छिनत्तव्यां उष्णेनाभिपूरयेत् अर्थ: शूद्राने ब्राह्मणाचा अपमान केला, तर त्याची जीभ कापून गरम तेल ओतावे. मनुस्मृती 8.272 यदि शूद्रः पठेद् वेदान् दण्ड्यः स्यात् स मृत्युभिः अर्थ: शूद्राने वेद ऐकले किंवा उच्चारले तर त्याला मृत्युदंडास पात्र ठरवावे. आजही मनूला आदर्श आणि पूज्य मानणारे मन अस्तित्वात आहे. मनूचे समर्थन करणारे जर फक्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य ह्या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनूला पूज्यच ठरवू लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणून मनुस्मृती दहन करणे भाग पडते. मनूचे समर्थन करणारे आधुनिक विद्वान कुठपर्यंत विपर्यास करतील याला सीमा नाही. ते दास्याचे वर्णन करणारे श्लोक समतेचा आधार म्हणून सांगतील. सर्वांना कमाल दारिद्रयात राहणे भाग पाडणाऱ्या व्यवस्थेचे वर्णन "गरजेनुसार दाम" ह्या समाजवादी परिभाषेत करतील. सर्वांच्यावर परंपरेचे गुलाम असण्याची जबाबदारी, तिला वहिवाटीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य म्हणतील. हे सारे प्रयत्न फक्त मनूचे समर्थन करता यावे यासाठी आहेत. हे प्रेम मनू नावाच्या माणसाविषयी नाही. मनू हा ब्राह्मणांचा व ब्राह्मण्यांचा संरक्षक म्हणून ब्राह्मणांचे स्वतःच्या हितसंबंधावरील प्रेम. हे हितसंबंध टिकवेत हा आग्रह मनूच्या प्रेमाचे रूप घेतो. इहलौकिक व आर्थिक हितसंबंध धार्मिक पूज्यबुद्धीचे रूप घेऊन समोर येतात. आजही ही प्रक्रिया चालू आहे. ती स्पष्टपणे समोर असावी म्हणूनच या मनुसमर्थकांचा विचार करणे भाग असते. ज्यांना काहीच माहिती नाही, ज्यांच्याजवळ धर्मप्रेम व श्रद्धा यापेक्षा अधिक काहीच नाही, त्यांना क्षमा करता येते व त्यांच्या सुधारणेचा प्रयत्नही करता येतो. पण जे जाणूनबुजून आपल्या हितसंबंधांची सोय पाहतात त्यांना केवळ ज्ञान देणे पुरत नाही. त्यांना क्षमाही करता येत नाही. मनुस्मृती दहनाचे कारण दीड हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ नसतो. मेधातिथी व कुलकभट्टासारखे हजार-आठशे वर्षांपूर्वीचे लोक नसतात. आजचे स्त्रियांच्या बलात्कार्यांचा जाहीर सत्कार मिरवणूक काढणारे लोक या दहनाचे खरे कारण आहेत. विसाव्या शतकाचे प्रश्न विसाव्या शतकात जे दहाव्या शतकाला आदर्श मानून विचार करतात त्यांचा निषेध करुन, प्रतिकार करून सोडवावे लागतात. भांडण भूतकाळातील मृतांशी नाही. भांडण वर्तमानकाळातील हयात परंपरावाद्यांशी आहे. वेदसंहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषदे यांच्यामधून मते व विचार यांची सतत उचल करणे ही धर्मसूत्रांची तशीच मनुस्मृतीची पद्धत आहे. धर्मशास्त्र श्रुतीमधून केवळ मतच घेत नाही, आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आधार व समर्थनही श्रुतीतून घेतले जाते. या अर्थाने वेद हा धर्माचा आधार आहे. पुराणे व धर्मशास्त्रे तर एकमेकांवर संस्कार करीत, एकमेकांची उचल करीतच वाढतात. म्हणूनच माझे असे म्हणणे आहे की दोष एकट्या मनूचा नाही. सारी परंपराच दोषी आहे. या परंपरेचा एक प्रातिनिधिक नमुना म्हणून मनुस्मृती असते. मनुस्मृतीदहन हा सगळ्या परंपरेचा धिःकार असतो. मनू हे निमित्त. हा मुद्दा वारंवार सांगण्याचे कारण हे आहे. हे सर्व धर्मशास्त्रकार मंडळी-मग ते धर्मसूत्रकार असोत वा स्मृतीकार असोत अगर स्मृतींचे भाष्यकार, निबंधकार असोत-या सर्वांनी 'व्याज' या कल्पनेला स्पष्टपणे मान्यता दिली आहे. इतरांच्या श्रमातून निर्माण झालेली संपत्ती श्रम न करता आपल्या मालकीची करण्याचे व्याज हे फार महत्त्वाचे साधन आहे. संपत्ती संचय, इतरांच्या श्रमांचा अपहार, पैसाच नवा पैसा गोळा करण्यासाठी वापरणे, या साऱ्या यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक व्याज असतो. या व्याजाच्या कल्पनेला सर्व पुण्यवानांनी वसिष्ठांचे नाव पुढे करून मान्यता दिली आहे. वसिष्ठांनी ठरविलेले दरच मनु व कौटिल्य मान्य करतात. मनूला व्याजाविषयी आस्था आहे. आज मनुस्मृतीत आहे तो परंपरामान्य विचारांचा संग्रह. ही मते एकट्या भृगूकुलाची नाहीत. ही मते केवळ इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील नाहीत. ती त्या मागे आठशे वर्षे चालत आलेली आहेत. मनुस्मृतीत कुठे नावीन्य, अपूर्वता अगर विचारांची चमक नाही. प्रतिगामी विचारांचे का असेना पण बुद्धीला प्रभावित करणारे ते चिंतन नाही. मनुस्मृती हा कोणतीही अपूर्वता अगर बौद्धिक चमक नसणारा प्रचलित विचारांचा संग्रह मात्र आहे. मनू अनेकदा स्त्रियांचा व शूद्रांचा एकत्र उल्लेख करतो. (उदा. मनु. ५/ १३९). कधी स्त्रियांचा व जनावरांचा तो एकत्र उल्लेख करतो. (उदा. मनु. ५/ १३०). त्याच्या मते कोणतेही कार्य स्वतंत्रपणे करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही, म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे कार्य करू नये. (५/१४७). स्त्रीच्या जीवनाची इतिकर्तव्यता परवश राहण्यात आहे. पती हा तिचा मुख्य मालक. त्यापूर्वी पिता आणि पतीच्या नंतर पुत्र. असे कुणाच्या तरी ताब्यात स्त्रीने राहिले पाहिजे. तिने स्वतंत्रता स्वीकारू नये (मनु. ५/१४८). पिता अगर त्याच्या संमतीने वडील भाऊ कोणत्याही स्त्रीला ज्याला अर्पण करील त्याच्या ताब्यात स्त्रीने राहावे. त्याची जन्मभर सेवा करावी (मनु. ५/१५१). पती शीलरहित स्वेच्छाचारी असला तरी तो देव मानावा (मनु. ५/१५४). पती वारला तरी त्याची इच्छा मोडू नये. आमरण व्रतस्थ रहावे. परपुरुषाची इच्छा करू नये (मनु. ५/१५८). पुरुषांनी मात्र पत्नी वारल्यास नव्याने गृहस्थाश्रम पुढे चालू रहावा यासाठी पुनः लग्न करावे (मनु. ५/१६८). स्त्रीला नव्याने पती करण्याचा अधिकार नाही (मनु. ५/१६२). स्त्री स्वतंत्र नाही, तिने नेहमी पुरुषाच्या आधीन असावे (मनु. ९/२). स्त्रीला तिच्या पतीने जरी घरात कोंडून ठेवले तरी ते संरक्षणच आहे (मनु. ९/१२). स्त्रिया चटकन व्यभिचारी होणाऱ्या आणि चंचल मनाच्या असतात. (मनु. ९/१५). स्त्रियांना नटण्याची आवड फार. क्रोध, खोटेपणा, झोप या बाबी स्त्रियांच्या ठिकाणी जगदोत्पत्तीपासूनच आहेत (मनु. ९/१७). स्त्री म्हणजे असत्य (मनु. ९/१८). जुगारी, मद्यपी, व्याधिपीडित अगर षंढ जरी पती असला तरीही तो सेव्य आहे. त्याची सेवा करावी. हे तर अतिशय सौम्य आहेत. याहून गलिच्छ मानसिकतेचे श्लोक वाचून तुमचं डोकं सुन्न होईल पन जे लोक आज ह्या मनुवाद्याच्या समर्थनार्थ उभे आहेत त्यांना माहित असायला हवं कि ते कोणत्या विषारी सापाला पोसत आहे. आज ते दुसऱ्या धर्माची खोटी भीती (खतरे में है )दाखवून तुम्हाला त्यांच्या बाजूने घेतील पन पुढे ते जाती जातीत, भाषे भाषेत भीती निर्माण करतील आणि सत्ता उपभोगत शोषण करत राहतील. ह्याच अंतिम ध्येय बेलगाम सत्ता, सहज कष्टविना पैसा आणि शोषण हेच असणार आहे हे इथल्या माणूस नावाच्या विचारी प्राण्याने विसरु नये म्हणून हि खटाटोप. एक दीर्घ चिंतन, चिकित्सा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प आहे. मला असं वाटते कि तो लिहिणं तेव्हढ कठीण नाही पन छापून येणं जास्त जिकिरीच असणार आहे. बघूया. चांगभलं. - किरण

Comments

Popular posts from this blog

अखेरचा निरोप

जन्मदिवस तुझा

शिवराय गीत