प्रेमाचे मलंग रस्ते
"तुला आठवतय का रे? मी तुला विचारलं होत,
हे रस्ते कुठे संपतात?"
एसटि बसच्या खडखडणाऱ्या खिडकिच्या सुरात सुर मिसळत धावणाऱ्या रस्त्यावर नजर स्थिर करत तिने त्याला विचारलं.
"हुम्म... "
बराच वेळ वाचत असलेलं तिच्या कवितांच पुस्तक मांडिवर ठेवत सुरकुत्या हाताने चष्मा उतरवत होकारार्थी मान हलवुन तो उत्तरला *"हे रस्ते तिथे संपतात जिथे आपल शोधन संपत."
तिस एक वर्षांपूर्वी त्यांच्या बस मधल्या पहिल्या भेटितल्या तिच्या पहिल्या प्रश्नाला दिलेल हे त्याच उत्तर होत.
त्याच्या नजरेची किरणं तिच्या विस्मयकारी कायेला छेदत असतांना कौतुकाने तो उद्गारला,
"पक्के अनोळखी असुन लख्ख ओळख असल्यागत किती बोलत सुटलो होतो आपण त्या पहिल्या भेटित."
"एकटेपणाच्या झळा,दगाबाजीच्या कळा सोसलेले दोन वाटसरु भेटल्यावर आणखी काय होणार माझ्या प्रवाशा?"
हसत हसतच तिची नजर आता त्याच्या चेहऱ्यावर गर्द आभाळागत पसरली.
"तु त्या दिवशी नक्कि काय शोधत होतीस?"
त्याला अन् तिला दोघांनाहि उत्तर ठाऊक होत,फक्त कधी बोलुन दाखवण्याचा खटाटोप त्यांनी केला नव्हता.
"प्रेम पुन्हा होतं का?याच उत्तर शोधायला निघाले होते.खरच किती व्यर्थ शोध होता ना तो."
तिच्या सुरकुतलेल्या गालांमध्ये हसु कैद करुन हलकिशी नकारार्थी मान हलवत तिने उत्तर दिल होत.
त्याच्या थरथरत्या हाताने तिच्या गालावर सैरभैर नाचणारी बट तिच्या कानामागे नक्षी काढावी तशी अलगद वसवत त्याने एक उत्तर दडलेला प्रश्न मुद्दामच फेकला,
"मग माझ्या संगिनी,प्रवासिनी!त्या प्रश्नाच उत्तर तुला मिळालं कि नाहि?"
अस म्हणताच दोघांचहि हसु खिडकिच्या सुरांत,रस्त्याच्या उरात,आभाळाच्या धडात,उलट धावणाऱ्या झाडांत, किरणांच्या झऱ्यांत अस काहि मिसळलं कि सारी प्रश्न,सारी उत्तर व्यर्थ होऊन विरुन गेली.
एसटिची लाल परी रस्त्यावरुन सुसाट धावत होती... अन् एक लाल परी ह्या दोघांच्या मनात,शोधाच्या पलिकडे सुसाटली होती.
तिच्या मांडिवर डोक ठेऊन तिची एक कविता गुणगुणत तो निश्चिंत निजला.
"प्रवास अंत शोध अंत नाहि अंत वाटेला..
नात संपत विरहाची खंत अनंत संधी प्रेमाला...
सोडुन जाती सहप्रवासी तोडुनी हृद्याचे लचके...
आपण उठावे शोधावे चालावे प्रेमाचे मलंग रस्ते..."
शोध संपतो,रस्ते नाहि संपत.
एखाद नात संपत,प्रेम नाहि संपत.
सोडणारा सोडुन गेला कि त्यासोबतचा प्रवास संपतो, आपल्यातल्या प्रेमाचा रस्ता नाहि.
त्यावर चालत रहावे मुक्तपणे.प्रेमाला नव संधी द्यावी नव्याने अंकुरायला.
Comments
Post a Comment
YOUR REVIEW TO THIS POEM